Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeखेळ जगतराज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत जळगावच्या ओवी पाटील व श्रद्धा इंगळे या जोडीचा विजयी...

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत जळगावच्या ओवी पाटील व श्रद्धा इंगळे या जोडीचा विजयी जलवा..

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चंद्रपूर येथे आयोजित स्व. डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा – 2025 मध्ये जळगावच्या ओवी पाटील (चाळीसगाव) व श्रद्धा इंगळे (कराड) या दुहेरीने १३ वर्षा खालील गटात राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले.

दि. 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान चंद्रपूरच्या अत्याधुनिक स्पर्धा मैदानात आयोजित झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत ओवी पाटील व श्रद्धा इंगळे यांनी उत्कृष्ट खेळाचा परिचय दिला. त्यांनी सेमीफायनल मध्ये मुंबई उपनगरातील हेजल जोशी व स्पृहा जोशी यांना २१-१५ व २१-१४ या सेटने पराभूत करून अंतिम सामन्यासाठी आपली जागा निश्चित केली.

अंतिम सामन्यात ओवी पाटील – श्रद्धा इंगळे यांनी मायरा गोराडिया व कनक जलानी (मुंबई) यांचा दमदार सामना करत २१-१४ व २१-१५ हे सेट जिंकत सुवर्णपदकाचा मान पटकावला. त्यांच्या विजयानिमित्त ट्रॉफी, रोख रक्कम आणि प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

ओवी पाटीलचे वडील अमोल पाटील हे चाळीसगाव येथील काकासाहेब पूर्णपात्रे शाळेतील क्रिडा शिक्षक असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ओवीने बॅडमिंटन क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवले आहे. या यशाबाबत जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे व प्रशिक्षक किशोर सिंह यांनी ओवी पाटील व अमोल पाटील यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.

स्पर्धेतील विजयानंतर जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षक श्रीमती दीपिका ठाकूर व महिला खेळाडूंनी जळगाव रेल्वे स्थानकावर ओवी पाटील यांचे भव्य सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या विजयानं संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाची लहर निर्माण केली असून ओवी पाटील व श्रद्धा इंगळे यांची आगामी स्पर्धांमध्येही अधिक यशस्वी वाटचाल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या