Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव शहर पोलिसांची धडक कारवाई ; गुन्हेगारांच्या टोळीसह १.७८ लाख रुपये किमतीचा...

जळगाव शहर पोलिसांची धडक कारवाई ; गुन्हेगारांच्या टोळीसह १.७८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांच्या गुप्त व सखोल तपासानंतर शास्त्री नगर परिसरातून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण १ लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास शास्त्री नगर भागात संशयित तरुणांची संशयास्पद हालचाल आढळून आली होती. तत्काळ पोलिसांनी धडक कारवाई करत सलीम रमेश पटेल (वय ३८), मुथा रामचंद्र पाटील (वय ४३), युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३), सोहेल शेख वसीम शेख (वय २९), शाहीन नगरातील आणखी एक तरुण (वय २९) या आरोपींना ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता तपासात समोर आले की, या टोळीचे सदस्य गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध गंभीर गुन्ह्यांच्या तयारीत गुंतलेले होते. आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमालात एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे, एक पिस्तूल सह सहा जिवंत राउंड्स, एक धारदार मोठा चाकू, चार चाकी वाहन क्रमांक (एम.एच. 43 यूआर 9678) एकूण जप्तीचा मुद्देमाल मूल्य ₹1,78,000 एवढा आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींचा गुन्हेगारी इतिहास उघडकीस…
पोलिस तपासात उघड झाले की, ताब्यात घेतलेले आरोपी पूर्वीही चोरी, घरफोडी, मारहाण यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरातील सध्याच्या परिस्थितीत या टोळीच्या अटकेमुळे भविष्यातील काही मोठ्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता अधिक वाढली आहे, असे पोलीस निरीक्षक गणपत पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रभावी कारवाईचे नेतृत्व…
ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अशोक पवार आणि अपर पोलीस अधीक्षक शिलवंत नाईक यांच्या देखरेखीखाली, पोलीस निरीक्षक गणपत पाटील यांच्या पथकाने यशस्वीपणे राबवली आहे.

सार्वजनिक आवाहन..
शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी टोळींचा मोठ्या प्रमाणात उलगडा करण्यासाठी पुढील काळातही पोलीस पथक नियमितपणे अशा धडक मोहिमा राबवत राहणार आहेत. नागरिकांनीही आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा १०० क्रमांकावर माहिती द्यावी, असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या