जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्यांचा विकास, संघभावना, खिलाडूवृत्ती व नेतृत्वगुण वाढीस लागावेत या उद्देशाने दि. ९ ते १० जानेवारी दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. सुशीलदादा अत्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव अभिजीत देशपांडे, सहसचिव सौ. मीराताई गाडगीळ, समन्वयिका सौ. विजयालक्ष्मी परांजपे, तालुका क्रीडा अधिकारी डॉ. सुरेश थरकुडे, मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, पर्यवेक्षक संजय वानखेडे, सौ. रमा तारे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवात लंगडी, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, क्रिकेट, व्हॉलिबॉल आदी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सकाळ व दुपार सत्रातील एकूण सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक सचिन देशपांडे व क्रीडा विभाग प्रमुख तथा उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धांचे सूत्रसंचालन उमेश ढाकणे यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन उल्हास ठाकरे यांनी केले. दोन दिवसीय या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

