जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- डोंगरगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील केवळ चार वर्षांच्या निरागस कुमारी प्रज्ञा दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येने संपूर्ण समाजमन हळहळून गेले आहे. या भयानक घटनेचा तीव्र निषेध करत तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी विविध सुवर्णकार सामाजिक संस्थांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने जमलेल्या समाजबांधवांनी पीडित बालिकेला श्रद्धांजली अर्पण करत एकमुखी स्वरात न्यायाची मागणी केली. छोट्या बालिकेवर झालेला क्रूर अत्याचार हा मानवतेलाच कलंक असल्याचे समाजातर्फे व्यक्त करण्यात आले.
प्रसंगी अध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ अध्यक्ष रंजना वानखेडे,मेळावा स्वागत अध्यक्ष रमेश वाघ,मेळावा प्रमुख सुभाष सोनार, नियोजन समिती प्रमुख शरदचंद्र रणधीर,सचिव प्रशांत विसपुते, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ सोनार, जेष्ठ समाज बांधव आणि आदी समाज बांधव उपस्थित होते. प्रसंगी संजय विसपुते यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या.घटनेतील आरोपीस तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी,हा खटला फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवून अल्पावधीत निकाल देण्यात यावा. प्रज्ञा दुसाने परिवारास शासनामार्फत योग्य संरक्षण, आर्थिक मदत व सर्व आवश्यक सोयी उपलब्ध करून द्याव्यात.जर आरोपीस शिक्षा नाही झाली तर आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल असे अध्यक्ष संजय विसपुते यांनी सांगितले. निवेदन महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव, अहिर सुवर्णकार महिला मंडळ, संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्था मेहरूण, हितकारणी सभा (खानदेश विभाग), सुवर्णकार कारागीर संघ, ऋणानुबंध वधू-वर पालक परिचय समिती तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सादर केले.
समाजाने व्यक्त केले की, “प्रज्ञा दुसाने साठी न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावी,” अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

