जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील नवीन बसस्टँड परिसरात घडलेल्या मोटारसायकल चोरी प्रकरणाचा जिल्हापेठ पोलिसांनी छडा लावत तिघा संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवीन बसस्टँड येथून मोटारसायकल चोरी झाल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २६ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास करत असताना प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. यामध्ये आरोपी १) मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, २) मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक आणि ३) अबुबकर नईम कौसर (सर्व रा. मालेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी नवीन बसस्टँड परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस (क्र. MH१९ BS १५७३) ही मोटारसायकल जप्त करण्यात आली.तसेच, पुढील तपासात आरोपींनी नाशिक येथून TVS कंपनीची रायडर (क्र. MH१५ JF ३६०९) मोटारसायकल घेऊन जळगावात येऊन ती एका साक्षीदारास विकण्याचा बहाणा करत कागदपत्रे नंतर देण्याचे सांगितले. त्यानंतर त्याच मोटारसायकलवर बसस्टँडवर येऊन दुसरी मोटारसायकल चोरी करून ती मालेगाव येथे घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.संबंधित दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.सदर तिन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक शांताराम देशमुख व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

