जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कृषी केंद्रांवर जिल्हा कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रासायनिक खतांचा पुरेसा साठा असूनही कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन खत विक्री परवाने थेट रद्द करण्यात आले असून १२ परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय सात खत विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामाला गती मिळाली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी कृषी केंद्रांकडे गर्दी केली होती. मात्र, अनेक ठिकाणी खत उपलब्ध असूनही विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना नकार दिला. या पार्श्वभूमीवर जिल्हा गुणवत्ता निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकांनी बनावट ग्राहकांमार्फत तपासणी मोहीम राबवली.
तपासणीत जळगाव, चाळीसगाव, जामनेर, अमळनेर आणि भडगाव तालुक्यांतील अनेक केंद्रांमध्ये गोदामात युरीया साठा असतानाही विक्रेत्यांनी खत उपलब्ध नसल्याचे सांगितल्याचे निष्पन्न झाले. तसेच दप्तर नोंदणीतील गोंधळ आणि विक्रीत तफावत देखील निदर्शनास आली.
जळगाव तालुक्यातील तीन, अमळनेर तालुक्यातील सहा, चाळीसगाव तालुक्यातील एक आणि भडगाव तालुक्यातील दोन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच चाळीसगावमधील तीन खत परवाने थेट रद्द करण्यात आले आहेत.
या कारवाईबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी सांगितले की, “रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही विक्री न करणाऱ्या, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या केंद्रांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही.”
जिल्ह्यात याआधी फेब्रुवारी महिन्यातही अशाच प्रकारे १८ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. मात्र, काही विक्रेते अजूनही नफेखोरीचा मार्ग सोडण्यास तयार नाहीत. अशांवर आणखी कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गुणवत्ता निरीक्षक विकास बोरसे यांनी दिला आहे.