पुणे-छत्रपती संभाजीनगर उच्चगती एक्स्प्रेस हायवेची ऐतिहासिक घोषणा
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी केली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणारा अत्याधुनिक उच्चगती एक्स्प्रेस हायवे उभारण्यात येणार असून, या महामार्गामुळे केवळ दोन्ही शहरांतील प्रवासाचा वेळच कमी होणार नाही, तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशच्या विकासाला नवे आयाम मिळणार आहेत.प्रस्तावित उच्चगती महामार्ग पूर्ण झाल्यानंतर जळगावहून पुणे अवघ्या तीन तासांत गाठणे शक्य होणार आहे. सध्या जळगाव ते पुणे या प्रवासासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागतो. मात्र, नवीन एक्स्प्रेस हायवे आणि समृद्धी महामार्गाशी होणाऱ्या जोडणीमुळे हा प्रवास अर्ध्यावर येणार आहे.
पुणे–छत्रपती संभाजीनगर अंतर दोन तासांत…
सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सुमारे सहा ते साडेसहा तासांचा वेळ लागतो. मात्र, प्रस्तावित उच्चगती महामार्गामुळे हे अंतर अवघ्या दोन तासांत पार करता येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. हा महामार्ग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित करण्यात येणार असून तो राज्यातील सर्वाधिक वेगवान मार्गांपैकी एक ठरणार आहे.
समृद्धी महामार्गाशी जळगावची थेट जोडणी..
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाशी जळगाव जिल्ह्याला जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वीच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच बैठकीत जळगाव ते छत्रपती संभाजीनगर प्रवास अधिक वेगवान करण्यावर सविस्तर चर्चा झाली होती.सध्या जळगावहून अजिंठा–सिल्लोड मार्गे छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी सुमारे अडीच तास लागतात. मात्र, हा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर अंतर अवघ्या एक तासावर आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे अंतर उच्चगती महामार्गावरून दोन तासांत पार करता येणार असल्याने, जळगाव ते पुणे हा संपूर्ण प्रवास केवळ तीन तासांत शक्य होणार आहे.
१६ हजार ३१८ कोटींचा भव्य प्रकल्प..
पुणे–छत्रपती संभाजीनगर उच्चगती महामार्गासाठी सुमारे १६ हजार ३१८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामध्ये उच्च दर्जाचे रस्ते, आधुनिक पूल, उड्डाणपूल, सेवा रस्ते, सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक सुविधा, तसेच वेगवान व सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक सर्व यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
औद्योगिक, व्यापारी व सामाजिक विकासाला चालना..
हा प्रकल्प केवळ दळणवळण सुलभ करणारा ठरणार नसून, महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासालाही मोठी चालना देणारा ठरणार आहे. पुणे हे आयटी, शिक्षण व औद्योगिक केंद्र असून, छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन, औद्योगिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. या दोन्ही शहरांमधील थेट व जलद संपर्कामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन तसेच रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यासोबतच जळगाव जिल्हा व संपूर्ण खान्देश विभागाला या महामार्गाचा मोठा लाभ होणार असून, विकासाच्या नव्या शक्यता निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

