६ एप्रिलपासून नवी अंमलबजावणी; मोहाडी येथील ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅकचा वापर
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता वाढविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) वाहन चाचणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, ६ एप्रिलपासून वाहन चालविण्याची चाचणी (ड्रायव्हिंग टेस्ट) आता थेट आरटीओ मुख्यालयातच घेतली जाणार आहे.
पूर्वी विविध ठिकाणी घेतली जाणारी चाचणी प्रक्रिया आता केंद्रीकृत करण्यात आली असून, यासाठी मोहाडी येथील अत्याधुनिक ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचा वापर केला जाणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे वाहन चालविण्याची चाचणी अधिक अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन उमेदवारांचे मूल्यमापन संगणकीकृत पद्धतीने केले जाणार आहे. त्यामुळे लायसन्स मिळविण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या अनियमितता कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक विश्वासार्ह आणि सुलभ सेवा मिळणार आहे.
दरम्यान, या बदलामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार असून, वाहन परवाना मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

