जळगाव/प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- शहरात आज सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन शहरातील विविध भागांची पाहणी केली. त्यांनी प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणांना सक्रिय राहण्याच्या सूचना दिल्या असून, वाहतुकीचे मार्ग लवकरात लवकर खुले करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, “वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात येत असून, प्रशासनाकडून शक्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.”आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास 1077 हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तास पावसाची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य खबरदारी घ्यावी.