जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरात काल संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. या हवामानाच्या अचानक बदलामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला तसेच काही ठिकाणी घरांचे आणि दुकाने यांचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीची कारवाई सुरू केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजेंद्र पाटोळे यांनी आज सायंकाळी बाधित भागांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरीत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. महापालिका, वीज वितरण कंपनी आणि अग्निशमन विभाग या यंत्रणांनाही आवश्यक कार्यवाहीसाठी सतर्क ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.