जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, त्याच्या नावाची तुलना थेट चर्चित वाल्मीक कराडशी केल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे माजी पदाधिकारी संजय वराडे यांनी पोलीस कर्मचारी अतुल वंजारी याच्यावर गंभीर आर्थिक आणि सेवाव्यवस्थेतील गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत.वराडे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या घटनेदरम्यान त्यांनी “जळगावातही एक ‘वाल्मीक कराड 2’ आहे” असा दावा करत अतुल वंजारी याचे नाव घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी अतुल वंजारी गेल्या 20 वर्षांपासून जळगाव शहरातच कार्यरत आहेत. त्यांच्या बदलीसाठी सामान्यतः लागू असलेले नियम बाजूला ठेवून, त्यांना सातत्याने जळगाव शहरातच ठेवले गेले आहे. विशेष म्हणजे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तब्बल आठ वर्षं सलग काम केल्याचे समोर आले आहे.वराडे यांचा आरोप आहे की, ट्रक चोरीच्या प्रकरणात वंजारी यांचा थेट सहभाग आहे. त्याशिवाय, त्यांनी अलिकडेच सुमारे 75 लाखांची शेती खरेदी केल्याचा आणि बुलेट मोटरसायकल रोख रकमेने खरेदी करून ती पत्नीच्या नावावर केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
तसेच, वंजारी यांच्याकडे एक कोटीहून अधिक रकमेच्या गुन्ह्यांचे तपास देण्यात आले असल्याची माहिती वराडेंनी दिली. सामान्य पोलीस कर्मचाऱ्याला एवढ्या गंभीर गुन्ह्यांचा तपास देणे संशयास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.दुसरीकडे, पोलीस कर्मचारी अतुल वंजारी यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संजय वराडेंवर दोन गुन्हे नोंद आहेत. त्यांचा तपास चालू असल्याने त्यांनी वैयक्तिक द्वेषातून हे आरोप केले आहेत. उर्वरित माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घ्यावी.”
सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत असून, पोलीस दलातील बदली धोरण, राजकीय हस्तक्षेप, आणि संपत्तीचे अनियमित व्यवहार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत तपास सुरू असून, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भूमिका आणि पुढील कारवाई काय असेल, याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.