जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील प्रशासकीय बदल्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मीनल करनवाल यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात विविध विकासकामांना चालना देत प्रशासनात ठसा उमटवला होता. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना मुंबई येथे ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोकरा) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रकल्प संचालकपदी जबाबदारी सोपवली आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
दरम्यान, नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नायर यांनी नाशिकमध्ये कार्य करताना शिस्तबद्ध प्रशासन आणि परिणामकारक कामकाजामुळे ओळख निर्माण केली आहे.जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेला अधिक गती देण्याचे आव्हान आता नायर यांच्यासमोर असेल. या बदल्यांमुळे जिल्हा प्रशासनात नव्या उत्साहाने कामकाजाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लवकरच दोन्ही अधिकारी आपल्या नव्या पदांचा कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती प्रशासनातून मिळाली आहे.

