२५ अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र राज्याला १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यास २५ अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था घडवण्याच्या दृष्टीने खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले असून, आज दिनांक १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता ते सुरू झाले.
या चर्चासत्रात उद्योग, शेती, सेवा क्षेत्र, पर्यटन, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण, स्टार्टअप्स आणि निर्यात यासारख्या विविध क्षेत्रांमधील सविस्तर सादरीकरण करण्यात येणार असून, जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या धोरणांवर मोकळेपणाने चर्चा होणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (IAS) यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ नागरिक, उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, संशोधक आणि सामाजिक संस्था यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चर्चासत्राच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक दिशा ठरवण्यासाठी सर्वसमावेशक सल्ला, सूचना आणि धोरणात्मक चर्चा यांचे संकलन करण्यात येणार असून, येत्या काळात जिल्हा विकास आराखड्याचा पाया या चर्चासत्रावर आधारित असणार आहे.