जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- टास्क पूर्ण करून त्यामध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा देण्याचे खोटे आश्वासन देऊन वेळोवेळी तरुणाच्या बँक खात्यातून ८ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन कन्हैया फिरके (वय ३१, रा. गिरीजा कॉलनी, भुसावळ रोड, ता. जामनेर) याने फिर्याद दिली आहे. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर राजचंदिका, अभिजीत, सुमित्राराव या अज्ञात नावाच्या व्हाट्सअप धारकांनी आणि टेलिग्राम धारकांनी चेतन फिरके याला वेळोवेळी संपर्क केला. एका योजनेखाली टास्क पूर्ण केल्यास अधिक नफा देण्याचे खोटे आश्वासन देऊन फिर्यादी चेतन याचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी फिर्यादीच्या बँक खात्यातून ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत ८ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम स्टेट बँकेच्या खात्यातून काढून घेतली.तसेच फिर्यादीला टास्क बद्दल भरलेल्या रकमेपैकी केवळ ६ हजार ८२५ रुपये वेळोवेळी पाठवले. तसेच जेपीजी स्वरूपात एक बनावट पत्र पाठवले आहे.त्यावर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज असलेला आणि भरलेली संपूर्ण रक्कम आणि नफा परत न करता फसवणूक केल्याप्रकरणीची फिर्याद चेतन फिरके यांनी दिली. त्यावरून जळगावच्या सायबर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव पाटील हे करीत आहेत.