जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- फुले मार्केटमधील दोन दुकानांमध्ये हिंदुस्थान लिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने तयार करून त्यांची विक्री बाबत तपासणी करण्यात आली. त्याठिकाणी सौंदर्य प्रसाधनाची ९९ हजार ६९८ रुपयांचे बनावट उत्पादने आढळून आली असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगावात फुले मार्केटमध्ये हिंदुस्थान लिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने असल्याची माहिती मिळाल्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दि.१६ नोव्हेंबर सोमवार रोजी सायंकाळी ६ वाजता साईश्रद्धा नॉवेल्टी, जय अम्बे कॉस्मेटीक या दुकानांमध्ये तपासणी केली. त्यावेळी तेथे बनावट सौंदर्य प्रसाधनांवर हिंदुस्थान लिव्हर कंपनीच्या नावाचा वापर करून त्याची विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाले.कंपनीचे हुबेहुब उत्पादने तयार करून त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे आढळून आले. या बनावट उत्पादनांचे एकूण बाजार मूल्य ९९ हजार ६९८ आहे.
या प्रकरणी कंपनी अधिकारी नयनतारा डेव्हिड डेमी (रा. बंगलुरू, कर्नाटक) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संतोष अरुण देवरे (३६, रा. कांचननगर), जगदीश गुलाबराव नागदेव (३२, रा. भुसावळ), विशाल कमलकुमार ढिंगवाणी (२४, रा. कंवरनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहेत.