जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरात वाढत्या मोकाट जनावरांच्या समस्येला आळा घालण्यासाठी नगर परिषद, जामनेर यांच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. दिनांक 12 जुलै 2025 रोजी राबविलेल्या या मोहिमेत एकूण २२ मोकाट जनावरे पकडण्यात आली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता, तसेच अपघात, आरोग्यधोके आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर नगर परिषदेने तातडीने पावले उचलली.
आरोग्य निरीक्षक श्री. विजय सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. याआधी शहरात ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना, वर्तमानपत्रांद्वारे जनजागृती, तसेच जनावरांच्या मालकांना नोटीस देण्यात आल्या होत्या.
नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणत्याही नागरिकाने आपल्या जनावरांना मोकाट सोडल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नगरपालिका कायद्यानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ही मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.