Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeक्राईमजामनेर: सहाय्यक महसूल अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षरीने शासनाची २१ लाखांहून अधिक रूपयांची फसवणूक..

जामनेर: सहाय्यक महसूल अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षरीने शासनाची २१ लाखांहून अधिक रूपयांची फसवणूक..

आरोपीने दिली कबुली ; निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना..!

जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक धक्कादायक फसवणूक प्रकरण उघडकीस आले आहे. सहाय्यक महसूल अधिकाऱ्याने तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून शासनाच्या नावावर सुमारे २१ लाख ६३ हजार २८५ रूपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी पुढील कारवाई सुरु आहे.

फसवणुकीचा प्रकार, बनावट दस्तऐवज आणि स्वाक्षरीचा वापर.
प्राप्त माहितीनुसार, सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील यांनी स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने शासकीय दस्तऐवज तयार केले. या बनावट दस्तऐवजांवरून शासनाचे खरे आदेश असल्याचे भासवून, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात अर्जदारांच्या माध्यमातून शासनाला सुमारे २१ लाख रूपयांचा महसूल बुडविण्यात आला. तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या तक्रारीनुसार या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.

संशयिताचा कबूलनामाः शासकीय फसवणुकीची दिली कबुली. 
सदर प्रकरणी तपास सुरू असताना, संशयित हर्षल पाटील यांनी आपल्याकडून शासनाची फसवणूक झाल्याची कबुली दिली आहे. त्यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे स्पष्ट केले की, शासकीय नजराणा रकमेच्या २१ लाख ६३ हजार रूपयांबाबत फसवणूक त्यांनीच केली आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचा आणि मुलांच्या भवितव्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करून अक्षम्य चूक दुरुस्त करण्याची संधी मिळावी, असेही त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

निलंबनाची कारवाई… जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव रवाना.
सदर प्रकरणाच्या गंभीरतेमुळे तहसीलदारांकडून संशयित सहाय्यक महसूल अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या संदर्भात जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे पुढील तपास करीत आहेत. शासनाच्या सुमारे २१ लाख रूपयांचा महसूल बुडविणाऱ्या या प्रकरणाचा त्वरित आणि निष्पक्ष तपास करण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

महसूल विभागाचे गैरप्रकार चव्हाट्यावर.
पाचोरा तालुक्यातही १५ दिवसांपूर्वी पीक नुकसान अनुदान वाटपासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या रकमेतून सुमारे एक कोटी २० लाख १३ हजार ५१७ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी महसूल सहायक अमोल भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात तहसीलदार विजय बनसोडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित भोई यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून शासकीय सेवेतून निलंबितही केले आहे. एकाच महिन्यात उघडकीस आलेल्या दोन्ही प्रकरणांमुळे महसूल विभागातील गैरप्रकार चांगेच चव्हाट्यावर आले आहेत. नागरिकांकडून त्याबद्दल तीव्र नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या