जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जामनेर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करत वाहन जप्त केले आहे. ही कारवाई जामनेरचे तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
संबंधित वाहन मौजे जामनेर परिसरातून वाळू भरून वाहतूक करत असताना स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आले. तत्काळ उपाययोजना करत महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्तरित्या कारवाई करत डंपर जप्त केला. यासंदर्भात संबंधितांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सातत्याने कारवाया करण्यात येत आहेत. जामनेर तालुक्यात अशा प्रकारच्या अनधिकृत कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महसूल व पोलिस विभाग पूर्णतः सज्ज असून कठोर पावले उचलण्यात येत आहेत.
पर्यावरण रक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. याबाबत तहसीलदार श्री. आगळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध वाळू वाहतूक व उत्खननासंदर्भात कुठलीही माहिती मिळाल्यास ती तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, जेणेकरून आवश्यक ती कारवाई वेळेत करता येईल.