केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. स्मिता वाघ, आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती
जळगाव/प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कार्य आणि विचाराची प्रेरणा घेवूनच आम्ही काम करतो. घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची ओळख संविधानातून करून दिली. अशा दोन आदर्श युगपुरुषांचे अत्यंत भव्य स्मारकं जामनेर मध्ये झाली, याचा आपल्याला आनंद झाला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जामनेर येथील सोनबर्डी टेकडी परिसर विकास अंतर्गत शिवस्मारक (शिवसृष्टी) आणि भीमस्मारक ( भीमसृष्टी ) लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. स्मिता वाघ, आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आ. सुरेश ( राजू मामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जामनेर शहरात जी भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमसृष्टी आपण निर्माण केली आहे. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देव, देश आणि धर्मावर सातत्याने आक्रमण होत असताना, महिलांची विटंबना होत असताना. सर्व सामर्थ्याने लढा देऊन रक्षण केले आणि स्वराज्य स्थापन केले. अशा आपल्या राज्यांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष असताना अशी भव्य शिवसृष्टी निर्माण केली हे अत्यंत आनंददायी आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य काय असतात हे संविधानातून दाखवून दिले. अशा या महामानवाच्या विचाराचे सदैव स्मरण करू देणारी भीमसृष्टी उभी केली.या शासनाने शेतकऱ्यांच्या , कष्टकऱ्यांच्या,महिलांच्या जीवनात बदल करण्यासाठी योजना आखल्या म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या विचाराने वाटचाल करत आहोत आणि पुढेही असेच काम करत राहू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे हे आम्हा जामनेरकरांचे स्वप्न होते ते आज पूर्णत्वास आले असून थोड्याच दिवसात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह, अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप, वसंतराव नाईक यांचे भव्य स्मारक तसेच संत सेवालाल महाराज यांची सृष्टी तयार करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.यावेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी जामनेर शहरात उभे असलेले दोन्ही स्मारकं आणि जामनेर तालुक्याचा झपाट्याने होणाऱ्या विकास यावेळी अधोरेखित केला. खा.छत्रपती उदयनराजे भोसले आणि आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही ग्रामविकास मंत्री यांच्या कार्याचे कौतुक करून भव्य स्मारक उभं केल्याबद्दल अभिनंदन करून सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
कशी आहे शिवसृष्टी
▪️छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठीत पूर्णाकृती साधारणतः १६ फुट उंचीचा ब्रांझ धातुचा पुतळा व सिहासन ३२ फुट आहे
▪️हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या नगारखानासहित वाड्याची भव्यदिव्य प्रतिकृती साकार केली आहे.
▪️या मराठामोळ्या शैलीच्या वाड्याची लांबी १०० फूट आहे आणि यात तळ मजल्यावर १२ खांब आणि पहिल्या मजल्यावर २४ खांब आहेत. वाड्याच्या बाजूच्या भिंतीची लांबी ५० फूट असून उंची वाड्याची तटबंदी धरून साधारण ३८ फूट आहे.
कशी आहे भीमसृष्टी
▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती साधारणतः १५ फुट उंचीची संविधान घेतलेली आणि राष्ट्राला उद्देश करत असलेली ही पूर्णाकृती भव्य मूर्ती साकार केली आहे.
▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २४ मुद्रा या त्यांना असलेल्या २४ उपाध्यांसहित कायमस्वरूपी अशा स्टील प्लेट्सवर महान विभूती गौतम बुद्धांच्या बोधिवृक्षाच्या पिंपळ पानांवर केल्या आहेत.
▪️डॉ. बाबासाहेबांच्या मूर्तीमागे संविधान चक्र केले असून त्यामागे बोधिवृक्ष साकार केला आहे. यातून महान गौतम बुद्धांच्या आशीर्वादाचे प्रतिबिंब आपल्याला दिसते.