भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दि.०५ सप्टेंबर रोजी जय लक्ष्मी क्लासेस, कुऱ्हे पानाचे येथे शिक्षक दिनाचा सोहळा अत्यंत उत्साही व भावनिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सर्व शिक्षकांचे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत करत त्यांना मानाचा मुजरा दिला. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत क्लासेसचे संचालक जय फालक, संचालिका लावण्या फालक, मार्गदर्शिका सौ. पूनम फालक व शिक्षिका ममता महाजन यांचा समावेश होता.
याप्रसंगी पूनम फालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत “नवा भारत घडवण्यासाठी मेहनतीने शिक्षण घ्या, आई-वडिलांप्रती कृतज्ञता ठेवा” असे प्रेरणादायी विचार मांडले. तर संचालक जय फालक यांनी, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे,” असे भावनिक उद्गार काढले. विद्यार्थ्यांनी फुलांचे गुच्छ देऊन शिक्षकांचे स्वागत केले. नाटिका, गीत, भाषण अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांमधून शिक्षकांवरील आदरभाव प्रकट केला.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. भावनांनी भरलेला हा क्षण पाहून अनेक शिक्षकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. या कार्यक्रमात पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.