प्रारूप प्रभाग रचनेवर हरकत व सूचना मागविण्यात येत आहेत
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना निश्चित करण्यात येत असून, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे सहसचिव यांच्या आदेशानुसार दिनांक १४ जुलै २०२५ रोजी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अधिसूचनेनुसार नागरिकांकडून हरकत व सूचना मागविण्यात येत असून, त्या २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करता येणार आहेत. ही हरकत प्रक्रिया लोकशाहीच्या दृढतेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, नागरिकांनी वेळेत आपली मते, हरकती लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
हरकत व सूचना जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व तहसील कार्यालयांमध्ये स्वीकारल्या जाणार आहेत. या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (महसूल) आणि उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), तसेच संबंधित तालुक्यांतील तहसीलदार चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जळगाव, जामनेर, धरणगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि अमळनेर येथील अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी संबंधित प्रभागाच्या अधिसूचनेवर प्राप्त झालेल्या हरकत अर्जांवर नियमानुसार कार्यवाही करतील.
जिल्हाधिकारीआयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, लोकशाही प्रक्रिया पारदर्शक आणि सर्वसमावेशक व्हावी या उद्देशाने ही पावले उचलण्यात आली आहे.