जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यात आज सोमवार रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावत उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिला. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांची मोठी धावपळ उडाली असून काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली होती. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यानंतर सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला. त्यानंतर ढगांचा कडकडाट सुरू होताच मुसळधार पावसाने जोर पकडला. पावसाच्या अचानक आगमनामुळे चाकरमाने, पादचारी तसेच रस्त्यावरील विक्रेते सुरक्षित ठिकाणांच्या शोधात पळापळ करताना दिसले. दुचाकीस्वारांचीही मोठी तारांबळ उडाली.जिल्ह्यातील काही भागांत पाण्याचे तळे साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आणि काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम होता. जळगावसह सावदा, नशिराबाद परिसरातही या वादळी पावसाचा प्रभाव जाणवला.
दरम्यान, कृषी विभागाने यापूर्वीच ३० मार्चपासून राज्यातील विविध भागांत वादळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार खानदेश, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. येत्या १ ते ४ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत, तसेच वादळी वारे व संभाव्य गारपीट यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

