Thursday, February 19, 2026
police dakshta logo
Homeजळगावजिल्ह्यात मोठ्या कर्जमाफीची हालचाल? ९४ हजार शेतकऱ्यांच्या ५१३ कोटींच्या कर्जावर निर्णयाची प्रतीक्षा

जिल्ह्यात मोठ्या कर्जमाफीची हालचाल? ९४ हजार शेतकऱ्यांच्या ५१३ कोटींच्या कर्जावर निर्णयाची प्रतीक्षा

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी घडामोड समोर येत असून, संभाव्य कर्जमाफीसाठी प्राथमिक स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र शासन यांनी जिल्हा बँक तसेच खासगी बँकांकडून कृषी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागविली आहे. जिल्हा बँकेच्या सुमारे ९४ हजार १२० सभासद शेतकऱ्यांकडे अंदाजे ५१३ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.माहिती संकलनासाठी थकबाकीदार सभासदांची नोंद स्वतंत्र नमुन्यात तर नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी वेगळी माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी संबंधित सोसायट्यांना यापूर्वीच नमुना अर्ज पाठविण्यात आले होते.

दरम्यान, शेतकऱ्यांची माहिती लवकरात लवकर पोर्टलवर नोंद व्हावी यासाठी गणेश कॉलनी येथील शाखेत विशेष कामकाज सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ३६८ सोसायट्यांमधील सुमारे ५१ हजार शेतकऱ्यांची माहिती प्रणालीवर अपलोड करण्यात आली असून उर्वरित संस्थांना तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मात्र, काही ठिकाणी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सचिवांकडून माहिती देण्यास विलंब होत असल्याचे चित्र दिसत आहे. वेतन व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे माहिती अपलोड प्रक्रियेला फटका बसत असल्याची चर्चा आहे. जर माहिती वेळेत सादर झाली नाही आणि शेतकरी संभाव्य लाभापासून वंचित राहिला, तर संबंधित संस्था पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी सूचना :
शेतकऱ्यांनी तातडीने आधार कार्ड संबंधित विकास सोसायटीत जमा करावे. तसेच स्वतःचे नाव थकबाकीदार किंवा नियमित कर्जदार यादीत आहे का याची खात्री करून आवश्यक कागदपत्रे त्वरित पूर्ण करावीत.

जिल्ह्यातील संभाव्य कर्जमाफीचे चित्र:..
थकबाकीदार शेतकरी : ९४,१२०
संभाव्य कर्जमाफी रक्कम : ५१३ कोटी रुपये
अपलोड झालेली नोंद : ५१,००० शेतकरी (३६८ सोसायट्यांतून)

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या