जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा–२०२५ संदर्भात कठोर निर्णय घेत नियोजित मुदतीत व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे सादर न करणाऱ्या २,२०७ उमेदवारांचे निकाल रद्द केले आहेत.TAIT परीक्षा २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत आयबीपीएसमार्फत ऑनलाईन पद्धतीने राज्यातील ६० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले होते. परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. B.Ed. व D.El.Ed. appear म्हणून अर्ज केलेल्या उमेदवारांना संबंधित व्यावसायिक अर्हतेची गुणपत्रके उत्तीर्ण झाल्यानंतर कमाल एका महिन्यात परीक्षा परिषदेकडे सादर करणे अनिवार्य होते. यासाठी परिषदेकडून १५ सप्टेंबर तसेच नंतर २५ सप्टेंबरपर्यंत अतिरिक्त मुदत देण्यात आली होती. मात्र, तरीही २,२०७ उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने त्यांचे निकाल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उमेदवारांची सविस्तर यादी परिषदेकडून www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, या निर्णयासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या विनंती किंवा हरकतींचा विचार केला जाणार नाही, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

