Saturday, February 14, 2026
police dakshta logo
Homeअपघातकालिंका माता चौकात भरधाव डंपरची धडक : वृद्धाचा मृत्यू ; नागरिकांकडून तोडफोड!

कालिंका माता चौकात भरधाव डंपरची धडक : वृद्धाचा मृत्यू ; नागरिकांकडून तोडफोड!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील कालिंका माता चौक परिसरात भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपरची तोडफोड करत दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७, रा. जुने जळगाव) हे बाजारहाट करून भाजीपाला घेऊन घरी परतत होते. याच वेळी चौकातून वेगात जाणाऱ्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डंपरचे चाक त्यांच्या चेहऱ्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार अपघाताच्या वेळी चालक मोबाईलवर बोलत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अपघाताची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले. यापूर्वीही याच ठिकाणी डंपरखाली चिरडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संताप अनावर झाला. संतप्त जमावाने संबंधित डंपरच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केले. वाढता तणाव लक्षात घेऊन दंगा नियंत्रण पथक व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

कालिंका माता चौक अपघातप्रवण ठिकाण ठरत असल्याने येथे तातडीने आधुनिक सिग्नल यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी २४ तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी ललित नारखेडे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या