Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावकामायनी एक्सप्रेस दरोडा प्रकरण: साडेचार लाखांच्या मुद्देमालासह चार दरोडेखोर एलसीबीच्या ताब्यात.

कामायनी एक्सप्रेस दरोडा प्रकरण: साडेचार लाखांच्या मुद्देमालासह चार दरोडेखोर एलसीबीच्या ताब्यात.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर हल्ला करून रोख रक्कम असलेली बॅग हिसकावणाऱ्या टोळीतील चौघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जळगाव येथे अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत सुमारे ४.५ लाख रुपयांचा रोख मुद्देमाल जप्त केला असून, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुढील तपासासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरोड्याची थरारक घटना

मंगळवार, दि. ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बऱ्हाणपूर-जळगाव रेल्वेमार्गावरील कामायनी एक्सप्रेसमध्ये (ट्रेन क्रमांक १०५८) ही घटना घडली. प्रवासी सुधाकर धनलाल पटेल (वय ६०, रा. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) हे आपल्या बर्थवर झोपलेले असताना चौघा अनोळखी इसमांनी त्यांच्या बॅगेवर झडप घालून हल्ला केला. बॅग हिसकावून घेतल्यानंतर हे चारही आरोपी रावेर रेल्वे स्टेशनवर उतरून पसार झाले होते.

एलसीबीची गुप्त माहितीवरुन कारवाई

गुरुवार, दि. १८ सप्टेंबर रोजी जी.एस. ग्राउंड परिसरात काही संशयितांची हालचाल होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या पथकाने तत्काळ कारवाई करत चौघा संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडील बॅगेची झडती घेतली असता, साडेचार लाख रुपये रोख रक्कम आढळून आली.

आरोपींची कबुली व तपशील

तपासादरम्यान चौघाही संशयितांनी रेल्वेत प्रवाशांवर हल्ला करून बॅग लुटल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये किरण पंडीत हिवरे (वय ३२, रा. भात्तखेडा, ता. रावेर), अजय सुपडू कोचुरे (वय २५, रा. खिर्डी, ता. रावेर), हरिष अनिल रायपुरे (वय २५, रा. प्रतापपुरा, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), गोकुळ श्रावण भालेराव (वय २७, रा. डांभुर्णी, ता. यावल) यांचा समावेश आहे.

पोलीस पथकाचा कौतुकास्पद पुढाकार

ही महत्त्वाची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोपान गोरे, प्रितम पाटील, यशवंत टहाफळे, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच तांत्रिक मदतीसाठी गौरव पाटील व मिलींद जाधव यांच्या पथकाची मोलाची भूमिका राहिली.

पुढील तपास लोहमार्ग पोलिसांकडे

सदर जप्त मुद्देमाल व आरोपींच्या ताब्यातील माहिती भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, इतर संभाव्य आरोपींना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या