Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeजळगावसोशल मीडियावरील तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या कंत्राटी पदभरतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकारी...

सोशल मीडियावरील तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या कंत्राटी पदभरतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्पष्टीकरण..!

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- सोशल मीडियाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार आणि नायब तहसीलदार या पदांची भरती आता कंत्राटी तत्त्वावर होणार आहे. अशा प्रकारच्या अफवा व बातम्या पसरविल्या जात आहेत. काही लोक या बाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या बातमीमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

जळगाव भूसंपादन शाखेमार्फत ही जाहिरात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निघाली होती. अशा प्रकारच्या जाहिराती शासन वेळोवेळी काढत असते. भूसंपादन प्रक्रिया राबविताना या प्रक्रियेसाठी आपल्याला अतिरिक्त मनुष्यबळ लागत असते. जे ठराविक कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावरती घेतले जाते. यामध्ये आपणास टायपिंगचे काम करणारे डेटा एन्ट्री ऑपरेटर त्याचबरोबर भूसंपादन प्रक्रियेविषयी संपूर्णपणे माहिती असलेले तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते. ज्यांना महसूल प्रशासनाच्या भूसंपादन प्रक्रियेचा अनुभव आहे, असे व्यक्तींचा त्यामध्ये समावेश केला जातो. यामध्ये या तज्ज्ञ व्यक्तींची निव्वळ कंत्राटी तत्वावर भरती केली जाते. या व्यक्तींना फक्त ठराविक कालावधी पुरते कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले जाते. त्यानंतर त्यांची सेवा समाप्त करण्यात येत असते. या पदाचा कालावधी कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त सहा महिन्याच्या असतो. या कालावधीमध्ये ते भूसंपादनाची प्रक्रियेसाठी प्रशासनाला सहाय्य करतात. या पदावरील व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र कार्यालय नसते. ते कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र निर्णय घेत नाहीत. त्यांच्या अंतर्गत कोणतेही कर्मचारी कार्यरत नसतात.

जळगाव जिल्ह्यात अशी भरती प्रक्रिया याच्या आधीही खूप वेळा झालेल्या आहेत. त्यामध्ये नवीन काही नाही. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, पाटबंधारे, जलसंपदा विभाग अशा विविध विभागांच्या विकास प्रक्रियेसाठी भूसंपादन केले जाते. आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २१४४ भूसंपादन केसेस प्रलंबित असून या केसेस लवकरात लवकर योग्य निर्णय करून मार्गी लावण्यासाठी काही कालावधीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी ही कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या