Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकर्जमाफी जाहीर असताना युनियन बँकेची सक्ती ; शेतकऱ्यांकडून कारवाईची मागणी..!

कर्जमाफी जाहीर असताना युनियन बँकेची सक्ती ; शेतकऱ्यांकडून कारवाईची मागणी..!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र शासनाने ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्जवसुली स्थगिती व कर्जमाफीची घोषणा केलेली असतानाही नशिराबाद येथील युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांकडून कर्जवसुलीची सक्ती सुरूच असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. फोनद्वारे तसेच घरी जाऊन अरेरावीची भाषा, धमक्या देणे आणि “कर्जमाफी घेतली तर भविष्यात कर्ज मिळणार नाही” अशा स्वरूपाचे दबाव तंत्र वापरल्याने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी अधिकच त्रस्त झाले आहेत. याविरोधात बुधवारी (१० डिसेंबर) दुपारी १२ वाजता शेतकरी, माजी सरपंच पंकज महाजन व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. अतिवृष्टी, नापिकी आणि जमीन धूप यामुळे गेल्या काही वर्षांत नशिराबाद परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना कर्जवसुलीची सक्ती न करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.

परंतु, युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी या निर्देशाकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांवर मानसिक दडपण आणल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. “निसर्गाची संकटे एकीकडे आणि बँकेची अमानवी वागणूक दुसरीकडे—ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ठरत आहे,” असे मत निवेदनात माजी सरपंच पंकज महाजन यांनी नोंदवले आहे.निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय चौकशी करून कठोर कारवाई करावी, अनधिकृत कर्जवसुली तात्काळ थांबवावी आणि घोषित कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देण्यासाठी दिगंबर जीवराम रोटे, निलेश सुरेश रोटे, चंद्रकांत देविदास तळेले, विनायक पांडुरंग चौधरी, पुष्कराज सुरेश रोटे, किरण रामा वाघुळदे, चंद्रकांत रघुनाथ पाटील, देवेंद्र हेमराज पाटील, संदीप विष्णू पाटील, केवल घनश्याम पाटील ई. शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या