जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव सांस्कृतिक नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधिनी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य श्रीराम रथ यात्रेचे कार्तिकी प्रबोधिनी एकादशी गुरुवार, २३ नोव्हेंबर २९२३ रोजी होत आहे. आज रथोत्सवानिमित्त भाविकांमध्ये उत्साह वाढला आहे. जुने जळगाव सह इतर भागातही भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
वंशपरंपरेने हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराजांचे हस्ते श्रीराम रथाचे पूजन आणि महाआरती होईल. संस्थान तर्फे उपस्थित प्रमुख अतिथी व रथोत्सवाचे मानकरी, सेवाधारी यांचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर श्रीराम रथावर आरुढ होणारी प्रभू श्रीरामचंद्रांची उत्सव मूर्तीची आरती होऊन रथावर मूर्ती विराजमान होईल. रथावर गरुड, मारुती, अर्जुन, दोन घोडे इत्यादी मूर्ती असतात.रथाचे अग्रभागी सनई, नगारा, चौघडा, झेंडेकरी, वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ तसेच आसपासच्या खेड्यावरील भजनी मंडळी, श्री संत मुक्ताबाईंच्या पादुका असलेली पालखी व त्यामागे श्रीराम रथ असा भव्य दिव्य जलग्राम नगर दिंडी प्रदक्षणा म्हणजेच रथयात्रेस दुपारी बारा वाजता श्रीरामांच्या जयघोषात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथून प्रारंभ होईल.
रथोत्सवात पांडुरंगाच्या उपस्थितीची भावना
रथाकरिता अवघ्या महाराष्ट्राच्या विविध भागातून अखंड असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग जळगावात येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. वारकरी संप्रदायाचे थोर संत श्री राम मंदिरांचे मूळ सत्पुरुष संत अप्पा महाराज यांनी हिंदू समाजातील अठरापगड जाती एकत्र करून हा रथोत्सव सोहोळा प्रारंभ केला. गेली १५० वर्षे झाली जळगावच्या असंख्य भाविक, नागरिकांच्या सहकार्याने हा रथोत्सवाची हि परंपरा अखंडपणे सुरु आहे.
रथाचा मार्ग असा…
रथ प्रस्थानाचा मार्ग श्रीराम मंदिर, भोईटेगढी, आंबेडकर नगर, तेली चौक, श्रीराम मंदिराचे मागील गल्लीतून, रथ चौक, बोहरा गल्ली, दाणा बाजार, अन्नदाता हनुमान मंदिर, चैतन्य मेडिकल समोरून प्रकाश मेडिकल, घाणेकर चौक, सुभाष चौक, सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम होऊन श्री मरी माता मंदिर भिलपुरा मार्गे भिलपुरा येथील संत आप्पा महाराजांचे परममित्र श्री संत लालशहा बाबा यांची समाधी येथे श्रीराम रथाचे सेवाधारी रामसेवक पुष्पहार अर्पण करतील.
बालाजी मंदिर, रथ चौकात रथ रात्री बारा वाजेपर्यंत परत येईल. रामांच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवून वाजत गाजत श्रीराम मंदिरात आणण्यात येतील तेथे प्रभू श्रीराम चंद्रांची शेजारती होत रथाची विधीवत समाप्ती होईल.
तमाम भाविकांना पोलीस दक्षता लाईव्ह टीमतर्फे श्रीराम रथोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा !
जय श्रीराम !