जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील माळी वाडा परिसरातील १३ तरुण केदारनाथसह उत्तर भारतातील विविध धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी गेले असताना, सध्या तेथील आपत्तीजन्य परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. २७ जुलै रोजी एमएच १९ सीवाय २२०२ क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलरने हे सर्व तरुण पाळधीहून निघाले होते. त्यांच्या परिवाराशी शेवटचा संपर्क दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी झाला होता. त्यानंतर मात्र त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची संपर्कसाधनं उपलब्ध होऊ शकलेली नाहीत.
ही माहिती समजताच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तातडीने दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांनी राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कक्ष तसेच संबंधित प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून माहिती घेतली आहे. ते बुधवारी रात्री दिल्लीहून उत्तरकाशीच्या दिशेने प्रयाण केल्याचे वृत्त आहे.
या तरुणांमध्ये रोहन दिनेश माळी, रोहित बंडू माळी, मनोज संजय चौधरी, ज्ञानेश्वर संजय माळी, दीपक रत्नाकर सोनार, संघदीप भारत नन्नवरे, दीपक माळी, वैभव गंगावणे, संदीप माळी, विशाल पाटील, रिंकेश खुशाल माळी, भूषण सुरेश माळी आणि पवन माळी यांचा समावेश आहे.
दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे देखील या तरुणांचा ठावठिकाणा लागावा म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहेत. गावातील ग्रामस्थ, कुटुंबीय आणि मित्रपरिवार चिंतेत असून अधिकृतरीत्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.