जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-
केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) तात्काळ सादर करावे, असे आवाहन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. प्रमाणपत्र वेळेत सादर न झाल्यास पुढील लाभ थांबविण्यात येऊ शकतो, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाने दिली आहे.
लाभार्थ्यांमध्ये पुढील योजना समाविष्ट आहेत:
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना
राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना
राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना
… व अन्य केंद्र पुरस्कृत सामाजिक सुरक्षा योजना
डिजिटल पद्धतीने घरबसल्या सादर करता येणारी प्रक्रिया:
हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता लाभार्थ्यांना कार्यालयात येण्याची गरज नाही. खालील पद्धतीने मोबाईलवरून हे सहज करता येते:
Aadhaar FaceRD अॅप Google Play Store वरून डाउनलोड करावे.
Beneficiary Satyapan अॅप डाउनलोड करून डिव्हाइस नोंदणी करावी.
आधार क्रमांक व OTP द्वारे चेहरा अथवा बायोमेट्रिक पडताळणी करावी.
यशस्वी पडताळणीनंतर हयात प्रमाणपत्र NSPT पोर्टलवर आपोआप अपलोड होईल.
SMS द्वारे याची पुष्टीही मिळेल.
जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ते ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून आपला हक्काचा लाभ चालू ठेवावा.