केरळ:- निपाह व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 700 रुग्णांपैकी 77 जणांना हाय रिस्क कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. केरळात मिनी लॉकडाऊन देखील लावण्यात आला आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसचे पाच रुग्ण; धोका वाढल्याने मिनी लॉकडाऊन जाहीर
केरळमध्ये आणखी एकाला निपाहची (Nipah) लागण झाली आहे. केरळमध्ये आणखी एक निपाहबाधित रुग्ण आढळल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढू लागली आहे. केरळमधील निपाह रुग्णांची संख्या 5 वर आली आहे, त्यामुळे केरळमधील आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे.
केरळ राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी राज्यात पाच निपाह रुग्ण आढळल्याची माहिती दिली. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, राज्य सरकारने संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 700 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी 77 जणांना उच्च जोखमीच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे.
केरळमध्ये याआधीही कोझिकोड जिल्ह्यातील दोन रुग्णांचा निपाहमुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे संपूर्ण केरळमध्ये निपाह व्हायरसचा फैलाव होण्याचा धोका आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. निपाह व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी केरळ प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. हाय रिस्क कॅटेगरीत ठेवण्यात आलेल्या 77 जणांना घराबाहेर न निघण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सण आणि कार्यक्रमांवर बंदी
याआधी निपाहमुळे मृत्यू झालेले दोन रुग्ण ज्या रस्त्यावरुन गेले होते, त्या मार्गांची माहिती लोकांना देण्यात आली आहे, जेणेकरून इतर लोकांनी त्या मार्गाचा, त्या रस्त्याचा वापर करू नये. कोझिकोड जिल्ह्यात सार्वजनिक उत्सव आणि इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
केरळमध्ये मिनी लॉकडाऊन
कोझिकोड जिल्ह्यातील 9 पंचायतींचे 58 वॉर्ड कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत, येथे फक्त आपत्कालीन सेवांना परवानगी आहे. आपत्कालीन जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी आहे. केवळ फार्मसी आणि रुग्णालयांना वेळेची मर्यादा नाही. कंटेनमेंट झोनमधून प्रवास करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बस केरळमध्ये थांबवू नये, असे आदेश देण्यात आहे.