पाचोरा/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, वीज पडून २५ वर्षीय शेतकरी तरुणाचा मृत्यू झाला आहे. मोहित जगतसिंग पाटील असे या युवकाचे नाव असून, ही घटना १४ जून रोजी दुपारी सुमारे ३:३० वाजता त्यांच्या शेतात घडली.
मोहित आपल्या शेतात काम करत असताना अचानक वीज पडल्याने ते गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत केली आणि त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या अचानक मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मोहित हे मनमिळावू, शांत स्वभावाचे आणि मेहनती शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे.घटनास्थळी अनेक ग्रामस्थ, स्थानिक नेते आणि पोलीस पाटील यांनी भेट दिली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोहित यांचा मृत्यू संपूर्ण परिसरासाठी एक अपूरणीय क्षती आहे.