भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावाजवळ जामनेर रोडवरील हॉटेल राजगड समोर शुक्रवारी (दि. १३ मार्च) सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास एका आयशर मालवाहू गाडीतील वस्तूंना अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतून उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार एमएच २० ईएल ८४६७ क्रमांकाच्या आयशर गाडीत इंडस्ट्रीज मटेरियल, सिलेंडर व इतर औद्योगिक साहित्य असा माल होता. गाडी हॉटेल राजगड समोर आली असताना अचानक मालाला आग लागली. ही घटना लक्षात येताच भुसावळ तालुका पोलिसांनी तात्काळ भुसावळ व जामनेर येथील अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.या गाडीचे चालक उमेश रमेश जाधव (रा. हातनूर, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) यांनी वेळीच गाडीतून उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. वाहन असलेल्या ट्रान्सपोर्टचे सुपरवायझर अरविंद उत्तम खंडारे यांच्याकडून पोलिसांनी प्राथमिक माहिती घेतली असून गाडीत इंडस्ट्रीज मटेरियल, सिलेंडर व इतर औद्योगिक वस्तू असल्याचे समजते.
घटनास्थळी पोलिसांसह गावातील ग्रामस्थांनीही मदतकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे आऊट पोस्टचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

