Sunday, February 22, 2026
police dakshta logo
Homeजळगावलेवा पाटीदार समाजाचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात ; १९ जोडपी विवाह-बंधनात

लेवा पाटीदार समाजाचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात ; १९ जोडपी विवाह-बंधनात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सामाजिक ऐक्य, साधेपणा आणि परंपरेचा संगम अनुभवायला मिळालेल्या भव्य सामूहिक विवाह सोहळ्यात रविवारी (ता. २२) लेवा पाटीदार समाजातील १९ जोडपी विवाहबंधनात अडकली. ‘अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ’ आणि ‘बहीणाबाई ब्रिगेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात हा मंगल सोहळा उत्साहात पार पडला.

सोहळ्याची सुरुवात सकाळी ११ वाजता जुन्या जळगावातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर परिसरातून झाली. नवरदेवांची पारंपरिक वेशभूषेत सजवलेल्या बैलगाड्यांवरील मिरवणूक हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. समाजबांधव मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. महिलांनी पारंपरिक पोशाखात मंगलवाद्यांच्या तालावर ठेका धरत वातावरण मंगलमय केले. फुगड्या आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. त्यानंतर विवाह सोहळा काशीबाई कोल्हे शाळेजवळील मीराई लॉन येथे पार पडला.

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी प्रमुख उपस्थिती लावून नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महापौर दीपमाला काळे, आमदार राजूमामा भोळे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका केतकीताई पाटील, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ), माजी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, युवा नेते धनंजय चौधरी तसेच ह.भ.प. भरत महाराज यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लेवा एज्युकेशन युनियनचे पदाधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले. त्यात प्रामुख्याने उल्हास चौधरी, कौशल पाटील, दीपक चौधरी, स्वप्निल चौधरी यांच्यासह नगरसेविका सिंधुताई कोल्हे, नगरसेवक विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर सीमाताई भोळे आणि सोहम खडके यांनी विशेष परिश्रम घेतले.महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करत सोहळा सुरळीत पार पाडला. युवक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक विवाहाच्या माध्यमातून समाजात एकात्मता आणि साधेपणाचा संदेश दिला.अवाढव्य खर्च टाळून सामूहिक विवाहाची परंपरा जोपासल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.

या उपक्रमामुळे सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले.जिल्हाभरातून आलेल्या समाजबांधवांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या