जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- श्रद्धा कॉलनी, जळगाव येथील ज्येष्ठ जैन धर्मानुयायी व समाजसेविका श्रीमती शकुंतलाबाई कांतीलाल जैन (वय ७८) यांचे दि. २ नोव्हेंबर रोजी पहाटे ६.४० वाजता अल्पशा आजाराने संथारा समाधीव्रत स्वीकारून शांत निधन झाले. त्यांच्या जाण्याने जैन समाजासह औद्योगिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे.
श्रीमती शकुंतलाबाई जैन या जळगावातील प्रतिष्ठित रायसोनी परिवाराच्या कन्या होत. त्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे संस्थापक आद्यऔद्योगिक भवरलालजी जैन यांच्या लहान भावजयी तसेच जैन श्री संघाचे संघपती श्री दलीचंद जैन यांच्या स्नुषा होत. त्यांचे सुपुत्र अभय जैन हे जैन इरिगेशनचे महाराष्ट्र विपणन प्रमुख असून अविनाश जैन हे जळगाव पॉलिमर्सचे संचालक आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, जावई, दोन मुली आणि नातवंडे असा आप्तस्वकीय परिवार आहे.गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी जैन परंपरेनुसार ‘संथारा व्रत’—अर्थात समाधीमरण व्रत—स्वीकारून शांतपणे देह ठेवला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या नेत्रदानाची पूर्तता करण्यात आली. श्रद्धा कॉलनी येथील निवासस्थानावरून सकाळी १०.१५ वाजता अंतिम यात्रा निघाली. मोक्षधाम, जैन हिल्स येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने जैन इरिगेशन परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक आणि विस्तारित सामाजिक परिघात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीस अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
प्लास्टिक उद्योगात उल्लेखनीय कार्य…
भारतीय प्लास्टिक व्यवसायातील त्यांच्या दीर्घकाळ योगदान आणि उल्लेखनीय यशस्वीतेबद्दल श्रीमती शकुंतला कांतिलालजी जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला होता. मुंबईतील ताज लॅण्डस् एंड, वांद्रे येथे झालेल्या भव्य समारंभात हा सन्मान जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.श्रीमती शकुंतलाबाई यांच्या कार्याने जळगावसह देशातील उद्योजक महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या निधनाने औद्योगिक क्षेत्रातही एक मातृसुलभ मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

