जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे. २१ जून रोजी शनिवार बाजार गस्तीदरम्यान संशयीत हालचाली करत असलेल्या एक आरोपी व दोन बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्यांनी चोरीचे मोबाईल जमिनीत पुरून ठेवले असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी नोरसिंह गुजरिया (वय २३, रा. इंदोर, म.प्र.) याच्या सांगण्यानुसार स्वामीनारायण मंदिराजवळील शेतातून ४,०९,००० रुपये किमतीचे एकूण ३३ मोबाईल हस्तगत केले. यातील काही मोबाईल रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करत आहेत.
महत्त्वाची सूचना:
ज्या नागरिकांचे मोबाईल हरवले/चोरीस गेले असतील, त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यास भेट देऊन IMEI नंबरच्या आधारे मोबाईलची माहिती घ्यावी.