मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील वीज ग्राहकांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुढील काही वर्षांत घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना वीजदरात घट अनुभवायला मिळणार आहे.
फडणवीस यांनी जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे, पहिल्याच वर्षी वीजदर १० टक्क्यांनी घटवले जाणार असून, पुढील पाच वर्षांत ही कपात एकूण २६ टक्क्यांपर्यंत होईल. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) महावितरणच्या याचिकेवर निर्णय घेतल्याने ही दरकपात शक्य झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील सुमारे ७० टक्के ग्राहक हे दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात, त्यामुळे त्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.याआधी, मागील काही वर्षांत वीजदर वाढीसंबंधी मोठा वाद निर्माण झाला होता, विशेषतः कोरोना काळानंतर वीजबिलांमध्ये झालेली वाढ नागरिकांसाठी जड ठरली होती. आता नवीन निर्णयामुळे दरवर्षी वीजबिलात टप्प्याटप्प्याने घट होत जाणार असून, सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.