मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील पोलीस दलातील रिक्त पदे भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, तब्बल 15 हजार पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षस्थानी हा निर्णय घेण्यात आला.
या भरती प्रक्रियेत 2022 आणि 2023 साली वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवारांनाही एकदाच विशेष संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच पोलिसांवरील वाढलेला कामाचा ताण कमी करण्यासाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.
भरल्या जाणाऱ्या पदांची विभागणी
पोलीस शिपाई – 10,908 पदे
पोलीस शिपाई चालक – 234 पदे
बॅण्डस् मॅन – 25 पदे
सशस्त्री पोलीस शिपाई – 2,393 पदे
कारागृह शिपाई – 554 पदे
यापैकी पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे गट–क संवर्गातील आहेत.
भरती प्रक्रिया कशी होणार?
भरती जिल्हा स्तरावर राबविण्यात येणार असून, उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी आणि OMR आधारित लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. अर्ज मागवणे, छाननी, शारीरिक परीक्षा व त्यानंतर लेखी परीक्षा अशा टप्प्यांमधून उमेदवारांना पात्र ठरावे लागेल. संपूर्ण प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे असतील.
भरतीची पार्श्वभूमी
राज्यातील पोलीस दल व कारागृहातील रिक्त पदांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडचणी येत होत्या. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी ही पदे भरावीत, असे निर्देश दिले होते. तसेच विधिमंडळ सत्रात अनेक लोकप्रतिनिधींनी ही पदभरती तातडीने करण्याची मागणी केली होती.
या निर्णयामुळे पोलीस दलातील मनुष्यबळ वाढणार असून, नागरिकांच्या सुरक्षेची पातळी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.