दिवाळीनंतर निवडणुकांचा प्रारंभ, टप्प्याटप्प्याने मतदान प्रक्रिया पार पडणार
मुंबई (वृत्तसेवा):- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असताना, महत्त्वाची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये VV-PAT (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) मशीनचा वापर होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
दिवाळीनंतर या निवडणुका सुरू होणार असून, टप्प्याटप्प्याने मतदानाची प्रक्रिया पार पडेल. सर्व निवडणुका एकत्रित घेण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली कोणती निवडणूक होणार हे अद्याप निश्चित नसले तरी निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे.
VV-PAT का नसेल?
राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत अनेक प्रभाग असतात आणि प्रत्येक प्रभागातून एकापेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यावे लागतात. अशा परिस्थितीत VV-PATचा वापर केल्यास मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया वेळखाऊ ठरते. यामुळे यंदा फक्त EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) चाच वापर होणार आहे.विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांप्रमाणे एका मतदारसंघातून एकच उमेदवार निवडला जातो, त्यामुळे तिथे VV-PATचा वापर सोयीस्कर असतो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत तीच पद्धत वापरणे अवघड ठरते.
मतदानाची वेळ
या निवडणुका डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान पार पडण्याची शक्यता असून, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने यंत्रणा सज्ज करण्यास सुरुवात केली आहे.