जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेले अत्याधुनिक महिला व बालकल्याण भवन आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सहा कोटी रुपयांच्या जिल्हा नियोजन निधीतून उभारलेले हे भवन राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महाबळ रोडवरील या आकर्षक इमारतीत आता महिला व बालकल्याणाशी संबंधित सात विभाग एकत्रितपणे काम करतील. यामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी (जळगाव शहरी), बालविकास प्रकल्प अधिकारी (दक्षिण प्रकल्प), जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र आणि ‘चाईल्ड लाईन’ यांचा समावेश आहे.
लोकार्पण सोहळ्यास खा. स्मिता वाघ, आ. सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, कार्यकारी अभियंता आर. बी. पाटील, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रफिक तडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, “महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा नियोजनातून अकरा ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे महिला बचत गटांना कायमस्वरूपी जागा आणि 12 महिने उत्पन्न देणारे स्रोत उपलब्ध होतील.”
ही इमारत केवळ अठरा महिन्यांत पूर्णत्वास आली आहे. जागतिक महिला दिनी भूमिपूजन झाल्यानंतर आज तिचे लोकार्पण झाले. यावेळी भवन साकारण्यात हातभार लावणाऱ्या कारागिरांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.