पारोळा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पारोळा तालुक्यातील राजवड येथे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून सुमारे ३४ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना २ ऑगस्ट रोजी पहाटे दोन ते चारच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी आमदार साहेबराव पाटील हे २७ जुलैपासून आपल्या कुटुंबासह नाशिक येथे गेले होते. त्यांची अनुपस्थिती साधून चोरट्यांनी त्यांच्या राजवड येथील बंगल्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. पहाटे २:३९ वाजता घरात घुसून केवळ ३५ मिनिटांत ३:१४ वाजेपर्यंत त्यांनी चोरी करून पोबारा केला, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
चोरट्यांनी घरातील कपाटे, बेड उचकून साहित्य अस्ताव्यस्त केले. चोरीला गेलेल्या मालामध्ये ३०० ग्रॅम सोन्याच्या मंगलपोत (अंदाजे किंमत ९ लाख), १६ सोन्याच्या अंगठ्या २०० ग्रॅम ( ७ लाख), ३ सोन्याचे नेकलेस २०० ग्रॅम (८ लाख), १० लाख रुपये रोख, ८ हजारांचा डिव्हीआर
असा एकूण ३४ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज आहे.
ही घटना सकाळी घरामागील अरुण पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पाटील यांच्या नातवाला कळवले. त्यानंतर नातेवाईकांनी घरात जाऊन पाहणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.
पोलिस उपविभागीय अधिकारी विनायक कोते, पारोळा पोलीस निरीक्षक सचिन सानप, एलसीबी निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र वलटे, एपीआय योगेश महाजन, हेडकॉन्स्टेबल कैलास साळुंखे आदींनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथक, फॉरेन्सिक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरु केला. मात्र अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही.
या प्रकरणी निलेश उर्फ बाळा अशोक पाटील यांनी फिर्याद दिली असून पोलिस तपास अधिक गतीने सुरू आहे. धरणगाव रस्त्यालगत सागाच्या झाडांमधून चार चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.