सिल्लोड | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भराडी येथे माता-पालक संघ स्थापना व सहविचार सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी पर्यवेक्षक भाऊसाहेब बोरसे यांची व्यासपीठावर उपस्थित होती. सर्वप्रथम आलेल्या सर्व महिलांचे प्रशालेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कुमारी श्रावणी टेहरके या विद्यार्थिनीने स्वागत गीत सादर केले.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक कोठावदे यांनी बदलापूर येथील घडलेल्या घटनेचा दाखला देत आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत तसेच संस्थेच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.सर्व शिक्षक मुलींच्या सुरक्षा संदर्भात लक्ष देत आहेत याविषयी माहिती सांगितली.
तसेच शिक्षकांनी वर्गात काय शिकवले आहे अशा प्रकारची विचारणा पालकांनी आपल्या पाल्याकडे केली पाहिजे,आपली पाल्य मोबाईलचा वापर कसा करत आहेत ,मोबाईल मध्ये काय पाहत आहेत,कुणाला मॅसेज करत आहेत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. प्रशालेतील भौतिक सुविधा, परीक्षा शुल्क, पैशाची किंमत याची जाणीव आपल्या पाल्यांना करून द्यावी. पालकांनी योग्य वयात आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, आणि वेळोवेळी अभ्यासा बाबतीत तपासणी करणे गरजेचे आहे असे सखोल मार्गदर्शन माननीय मुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे यांनी केले.
आलेल्या पालकांनी शाळेतील अध्यापन, विद्यार्थ्यांची शिस्त, मुलीकडे विशेष लक्ष याबाबतीत समाधान व्यक्त केले.
माता पालक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे हे आहेत तर या सहविचार सभेतून एक माता पालक उपाध्यक्ष म्हणून श्रीमती डोळस ताराबाई ईश्वर व एक सहसचिव म्हणून श्रीमती महाजन पुष्पा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजिका श्रीमती रेखा सोनुने यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वैशाली साळवे यांनी केले.फलक लेखन श्रीनिवास इंदुरकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी सहकार्य केले.