मुंबई /प्रतिनिधी/पोलिस दक्षता लाईव्ह :- राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी खेळण्यावरून संबंध महाराष्ट्रात याबाबत तीव्र आणि संतापजनक लाट उसळली. कोकाटे यांच्या कृषिमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असल्याने शासनावर विशेषतः राष्ट्रवादी पक्षावर दबाव वाढला होता. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खाते बदलाचा निर्णय घेऊन माणिकराव कोकाटे यांच्या जागी मकरंद जाधव- पाटील यांना कृषीमंत्री पद सोपवले. श्री. जाधव- पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन खाते होते. तसेच ते बुलढाण्याचे पालकमंत्री आहेत..
कोण आहेत मकरंद जाधव- पाटील ?...
मकरंद लक्ष्मणराव- जाधव मराठी राजकारणी आहेत. ते सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून आले आहेत. याआधी ते बाराव्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. श्री. पाटील यांनी 1987 – 88 मध्ये प्रवरानगर येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे.जाधव पाटील यांनी प्रादेशिक राजकारणात आपले स्थान मजबूत केले. 2014 आणि 2019 मध्ये सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून सलग विजय मिळवले आणि कधीकधी कोरेगावमधूनही निवडणूक लढवली. सुरुवातीच्या कुटुंबाच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल सार्वजनिकरित्या फारसे काही लिहिले जात नसले तरी, त्यांची प्रेरणा नेहमीच वाईच्या विकासात आणि स्थानिक साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन आणि महाबळेश्वर आणि खंडाळ्यातील पर्यटन विकास यासारख्या मुद्द्यांना संबोधित करण्यात गुंतलेली आहे.