मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दाम्पत्यासह त्यांची दोन मुले जागीच ठार झाले असून एक जखमी झाला आहे. बड्या कंत्राटदाराच्या भरधाव डंपरने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साधारण साडेबारा वाजेच्या सुमारास एमएच 19 सीएक्स 2038 क्रमांकाच्या डंपरने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकलवरील दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातामुळे मुक्ताईनगर–बुरहानपूर महामार्गावरील असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित कंत्राटदाराच्या वाहनांचा बेदरकार वेगाने वापर होत असल्याबाबत यापूर्वीही तक्रारी होत्या. आजच्या अपघातानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी अपघाती डंपरची तोडफोड केली.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

