मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह : मुंबई–नागपूर महामार्गावरील हरताळा फाटा येथे गुरुवारी सकाळी भीषण अपघात घडला. जळगावकडून मुक्ताईनगरच्या दिशेने येणाऱ्या अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार मजुरांना जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारमधील चालक घटनास्थळावरून फरार झाला असून कारला दोन नंबर प्लेट लावण्यात आल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हरताळा फाटा परिसरात ही घटना घडली. संबंधित कार राँग साइडने येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार मजुरांना कारने जोरदार धडक दिली. या धडकेत चारही मजूर गंभीर जखमी झाले.अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त कारची तपासणी करताना गाडीवर दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट लावलेल्या असल्याचे आढळून आले. यामुळे ही कार एखाद्या गुन्हेगारी कृत्यात वापरण्यात आली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे कारमध्ये पोलिसांच्या काठ्याही सापडल्याने संशय अधिकच बळावला आहे. काही शस्त्रसदृश साहित्यही गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे.अपघातात कारच्या पुढील भागाचा मोठा चुराडा झाला असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद केली आहे. फरार झालेल्या चालकाचा शोध सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

