Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईममुक्ताईनगर येथील तरुणाचा प्रेमसंबंधातून चाकूने भोसकून खून

मुक्ताईनगर येथील तरुणाचा प्रेमसंबंधातून चाकूने भोसकून खून

मुक्ताईनगर | प्रतिनिधी । पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर शहरात रविवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हॉटेल वृंदावनसमोरील प्लॉटिंगच्या मोकळ्या जागेत हा मृतदेह आढळून आला. चाकूने भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले असून, घटनेमागे प्रेमसंबंधातील वाद कारणीभूत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.मयत तरुणाची ओळख विष्णू गोसावी (वय २६, रा. मुक्ताईनगर) अशी पटली असून, तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास परिसरातील नागरिकांना मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलिसांना माहिती दिली. सूचना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

घटनास्थळाची पाहणी करता ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. विष्णू याचे प्रेमसंबंध, त्यातून निर्माण झालेला वाद किंवा सूडबुद्धी या कारणांवर पोलिसांचा तपास केंद्रित आहे. तो बेपत्ता झाल्यानंतर कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात होता, याबाबतही कसून चौकशी सुरू आहे.या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून, या गूढ खुनामागील सत्य लवकरच उघडकीस येईल, असा पोलिसांचा विश्वास आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या