मुंबई |प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींसाठी सुरु करण्यात आलेल्या मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंत्रालयात नुकतीच यासंदर्भात बैठक पार पडली.
या योजनेअंतर्गत शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच कायम विनाअनुदानित महाविद्यालये आणि तंत्रनिकेतनांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थिनींना शिक्षण व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. योजना शासकीय व सार्वजनिक अभिमत विद्यापीठांनाही लागू आहे. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव खोरगडे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री पाटील यांनी सर्व महाविद्यालयांनी ही योजना गांभीर्याने राबवावी, व एकही मुलगी या सवलतीपासून वंचित राहणार नाही, याची खात्री करावी, असे स्पष्ट निर्देश दिले.