मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुंबईतील आझाद मैदान परिसरातील मुंबई प्रेस क्लबला ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने आज, दि. २० मार्च २०२६ रोजी एकच खळबळ उडाली. धमकीचा ई-मेल प्राप्त होताच खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित इमारत तातडीने रिकामी करण्यात आली.घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांसह बॉम्ब शोध व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. मात्र प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस तसेच सायबर सेलमार्फत सुरू असून, धमकीचा ई-मेल ज्या आयडीवरून पाठविण्यात आला आहे, त्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

