कडगाव परिसरातील प्रकल्पस्थळी १०० मजुरांची पडताळणी ; रात्री उशिरापर्यंत सुरू होती चौकशी
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पोलिसांनी कडगाव शिवारातील एका पायाभूत प्रकल्पाच्या ठिकाणी पहाटे धाड टाकत सुमारे १०० मजुरांची सखोल पडताळणी केली. परप्रांतीय मजूर संशयास्पदरित्या वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या तपासणीत एकही बांगलादेशी नागरिक आढळून आलेला नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कडगाव परिसरातील पंपिंग हाऊस व लगतच्या प्रकल्पस्थळाला वेढा घातला. भागपूर ते शेळगाव पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बाहेरगावाहून आलेले मजूर वास्तव्यास असल्याची माहिती होती. या सर्व मजुरांना चौकशीसाठी नशिराबाद पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
या तपासणी दरम्यान नशिराबाद पोलिसांनी प्रत्येक मजुराची ओळखपत्रे, आधार कार्ड, बायोमेट्रिक तपशील तसेच मोबाईल फोनची तांत्रिक पडताळणी केली. प्राथमिक तपासात संबंधित मजूर हे पश्चिम बंगाल राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. काही कागदपत्रांतील पत्त्यांबाबत शंका निर्माण झाल्याने संबंधित कंत्राटदार व संस्थांचीही पडताळणी सुरू करण्यात आली आहे.या कारवाईदरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नशिराबाद पोलिस ठाण्याला भेट देऊन तपासाची माहिती घेतली. यावेळी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी उपस्थित होते. “नशिराबाद परिसरात कामानिमित्त आलेल्या मजुरांची केवळ संशयाच्या आधारे कागदपत्र पडताळणी करण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत कुणीही बांगलादेशी किंवा अन्य संशयित नागरिक आढळलेला नाही,” असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले.
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी “नशिराबाद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व कंपन्यांनी कामगारांना कामावर घेताना त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे करून व तपासूनच त्यांना कामावर घ्यावे. तसेच संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे.
याप्रकरणी संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल सादर केला जाणार असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशी दक्षता मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

